Abstract
'समकालीन' ही संकल्पना आपण इंग्रजीतील 'कॉंटेम्पररी' (Contemporary) या अर्थाने वापरतो. समकालीन असण्याचा मुद्दा बहुतेक सर्व मराठी साहित्यिक, लेखक, नाटककार, कवी, टीकाकार, समीक्षक, साक्षेपी संपादक आणि साक्षेपी प्रकाशक यांनी चर्चेच्या अग्रक्रमी ठेवला आहे. या साऱ्यांनी विशेषतः लेखक मंडळीनी आधुनिकतावाद, आधुनिकोत्तरतावाद, देशीवाद, नवनैतिकता, वास्तववाद इत्यादी संकल्पना मांडल्या. समकालीन किंवा समकालीनता हा 'आजचा समकालीन' मुद्दा आहे !? या साऱ्यांची बरीच चर्चा झाली आहे आणि होही आहे. या संदर्भात 'समकालीन' ही संकल्पना तपासली पाहिजे.
प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की 'समकालीन' ही जाणिव भारतीय नाही, ती आयात आहे. तिला सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञानाचा संदर्भ आहे. व्यापक अर्थाने तिचे स्वरूप तत्त्वज्ञानात्मक आहे. म्हणजे संकल्पना म्हणून ती तत्त्वज्ञानात्मक आहेच पण उपयोजन म्हणूनही ती स्वरूपाने तत्त्वज्ञानात्मक आहे.एखादी संकल्पना प्रत्यक्ष उपयोगात आणली जात असताना तिचे मूळ स्वरूप आणि तिचे उपयोजन कसे होते, यात मला रस आहे.